मुंबई: बॉलिवूडमधील अनेक सिनेमात डान्स केलेल्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असं या 32 वर्षीय डान्सरचं नाव आहे. अभिजीतने बुधवारी भांडुपमधील राहत्या घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
अभिजीतने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या सुसाईड नोटमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र कौटुंबिक तणाव, आर्थिक चणचण आणि काही दिवसांपासून काम न मिळाल्याने, अभिजीतने टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या आत्महत्येची नोंद भांडुप पोलिसात झाली आहे.
कौटुंबिक तणाव
दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबात सध्या तणाव होता. त्याची पत्नी तीन महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. अभिजीतला दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र पत्नी अभिजीतला मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे अभिजीत तणावात होता, असं पोलिसांनी सांगितलं.
या तणावातून अभिजीतने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आयुष्य संपवलं. अभिजीत राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे काही शेजाऱ्यांनी चौकशी केली असता, अभिजीतने गळफास घेतल्याचं समोर आलं.
शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अभिजीतला रुग्णालयात हलवलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
‘बँक खात्यातील पैसे मुलीला द्या’
अभिजीतजवळ जी सुसाईड नोट आढळली आहे, त्यात त्याने आपल्या बँक खात्यातील पैसे मुलीला द्या असं म्हटलं आहे.
दिग्गजांसोबत काम
दरम्यान, अभिजीतने बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. रणबीर कपूर, रणवीर सिंह यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत.
बॉलिवूडमधील सहकलाकार असो किंवा अभिजीतसारखे डान्सर असो, अशा कलाकारांचा संघर्ष, स्ट्रगल हा लपून राहिलेला नाही. कामाच ताण असो वा कौटुंबिक तणाव, विविध कारणांनी अनेक कलाकारांनी आयुष्य संपवलं आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे.