तात्काळ बंब उपलब्ध झाला असता, तर आग लवकर आटोक्यात आणता आली असती. बीएआरसीचे अग्निशमन अधिकारी बोरकर यांनी गांभीर्य लक्षात न घेता दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोईसर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 56 आणि 57 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसरमधील नोव्हेफेन केमिकल कंपनीत काल लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तारापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या अग्निशमन दलाला फोन केला होता. आग विझवण्यासाठी बंब पाठवण्याची विनंती करुनही बंब न पाठवल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.
पालघर MIDCमध्ये भीषण स्फोट, 6 कंपन्या जळाल्या, 15 किमी परिसर हादरला
केमिकल कंपनीला आग लागून बॉयलरचा स्फोट झाला होता. त्यामुळे परिसरातील अन्य सहा कंपन्यांनाही धोका निर्माण झाला. या दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सावरा यांनी दिले. सावरा यांनी तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे जखमींच्या तब्येतीची विचारपूसही केली.
यावेळी आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.