मुंबई: कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे.
किसान सभेच्या या लाँग मार्चला शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही पाठिंबा दिला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला.
मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले.
मनसे उद्या ठाण्यात आणि मुंबईत किसान लाँग मार्चाचं जंगी स्वागत करणार आहे.
दरम्यान, याआधी ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीही अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे. तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं.
दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष किसान सभेच्या लाँग मार्चला परवानगी देत आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी अजून याची दखल घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी अजित नवले यांनी केली.
किसान सभेचा लाँग मार्च
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. वाशिंद जवळील पडघा इथं हा मोर्चा दाखल झाला आहे.
हजारोंच्या संख्येने निघालेला हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडक देणार आहे.
मागण्या काय आहेत?
-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात
-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा
-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा
संबंधित बातम्या
शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर