ठाणे : रिक्षा परमिट, वाहन चालवण्याचा परवाना आणि रिक्षा बॅच बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून, त्याचा वापर आरटीओ कार्यालयात करणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखा भिवंडी युनिट-2 च्या पथकाने धामणकर नाका इथे छापा मारुन ही कारवाई केली. यापैकी दोघांना 18 जानेवारीला अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी दोघांना अटक करुन, अनेक बनावट दस्तऐवज आणि शिक्के हस्तगत केले.


पोलिसांनी 18 जानेवारी रोजी संजरी ऑटो कन्सल्टंट, धामणकर नाका इथून आरोपी नफीज सगीर अहमद फारुकी आणि आरोपी नाजील नवाज अहमद मोमीन यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट चारित्र्य प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा नागरिक असल्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट, रिक्षा परमिटचे दस्तावेज, मोटार विम्याचे कागदपत्र, लॅपटॉप, हस्तगत केले होते.

या दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी मोहम्मद इस्माईल मोहम्मद रजा अन्सारी उर्फ पप्पू आणि आरोपी संगमेश्वर मरोळसिद्ध स्वामी यांना अटक करुन त्यांची चौकशी केली. त्यानंतर आरोपी अन्सारी उर्फ पप्पू आणि स्वामी याच्या घराची झडती घेतल्यानंतर बनावट शाळा सोडल्याचे दाखले, डॉक्टरांचा बोगस शिक्का, आरटीओ अधिकाऱ्याचा शिक्का, बजाज इन्शुरन्स कंपनीचा शिक्का, तसंच या शिक्क्यांचा वापर करुन तयार केलेली कागदपत्र पोलिसांना सापडली.

या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चारही आरोपींकडून 45 बोगस चारित्र्य पडताळणी दाखले, 20 शाळा सोडल्याचे दाखले, 34 बनावट डोमिसाईल  प्रमाणपत्र, 44 विमा कंपनीचे बनावट दाखले, डॉक्टरांचा बोगस शिक्का,आरटीओ अधिकाऱ्यांचा शिक्का, बजाज इन्शुरन्स कंपनीचा शिक्का, 5 मोबाईल, 3 संगणक आणि 3 लॅपटॉप, असा 1 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिस पथकाने चौकशी करुन आरोपींच्या घराची आणि दुकानाची तपासणी केली असता, 284 फाईल, 211 ऑटो रिक्षाचे पासिंग फाईल, 39 इन्शुरन्स फाईल, 34 लर्निंग लायसन्स जप्त करण्यात आले आहेत. या चारही आरोपींना न्यायालयात नेलं असता न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.