मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी मोठा अनर्थ टळला. विसर्जनाला जात असताना एक बोट बुडाली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.


आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोटीतील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेतील महिलेसह मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोट उलटण्याची दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास पोलिस आणि फायर ब्रिगेडकडून केला जात आहे.

लालबागच्या राजाचं विसर्जन

गेले दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर राज्यभरातील गणपती बाप्पांचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात, फुलं आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली. काल सकाळी साडेदहा – अकरा वाजण्याच्या दरम्यान निघालेली लालबागच्या राजाची मिरवणूक आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली.

सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.