मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पदपथांना आता चकाकी मिळणार असून ते आता मोकळा श्वास घेणार आहेत. कारण, महापालिका प्रशासनाने आता सुधारित पदपथ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबई महापालिकेनं फेरीवाला मुक्त पदपथ मोहिम हाती घेतली आहे.


यापुढे सर्व पदपथ सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने सध्या असलेल्या पेव्हर ब्लॉकच्या पदपथांचं रुपांतर सिमेंट कॉन्क्रिटच्या पदपथांमध्ये केलं जाणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील पदपथ हे चालण्यासाठी सोयीचे, सलग, समतल असावेत, यासाठी महापालिकेने स्वतंत्र पदपथ धोरणाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरु केली आहे.


त्यानुसार यापुढे केले जाणारे नवीन पदपथ हे सुधारित धोरणानुसार करण्याचे प्रस्तावित केले आहे. 60 फूट रुंदी असणाऱ्या रस्त्याचे पदपथ हे 'पेव्हर ब्लॉक'चे असल्यास ते आता नवीन धोरणानुसार सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार असून त्यावर 'मार्बल चिप'चे फिनिशिंग किंवा 'ब्रुमींग टेक्श्चर' असणार आहे.


तर 90 फूट रुंदी असणाऱ्या रस्त्यांचे पदपथ आणि दोन मीटरपेक्षा अधिक रुंदी असणारे पदपथ हे स्टेन्सिल कॉन्क्रीट किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे असतील. तसेच त्यावरही मार्बल चिपचे फिनिशिंग किंवा ब्रुमिंग टेक्श्चर' करण्याचेही सुधारित धोरणात प्रस्तावित करण्यात आले आहे.


पदपथ हा नागरिकांना चालण्यासाठी असतो. हे लक्षात घेऊन यापुढे पदपथांवर कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चर किंवा स्टॉल बनविण्याच्या परवानग्या न देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत दिले आहेत.