मुंबई : राणीच्या बागेतील पेंग्विनच्या दर्शनासाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. शनिवारी यासंदर्भात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार, आत पेंग्विन दर्शनासाठी मुलांना 25 रुपये, तर प्रौढांना 100 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर दोन मुले व आई-वडील एकत्र आल्यास चौघांचे मिळून 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये, तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. मात्र पेंग्विन दर्शनासाठी यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. वास्तविक, दरवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीपूर्वीच निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी सेनेकडून हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याचं बोललं जात होतं.
मात्र, शनिवारी यावर शिक्कामोर्तब झालं असून, सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी 4 वाजेपर्यंत मुंबईकरांना पेंग्विन पाहता येणार आहेत. यासाठी नव्या दरानुसार त्यांच्याकडून शुल्क आकारले जाणार आहे.
याशिवाय, मॉर्निंग वॉकच्या पासमध्येही पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून महिन्याला 30 रुपये आकारले जात होते. पण आता यासाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत.