मुंबई : मुंबईत अभिनेत्री कंगना रनौत विरुद्ध मुंबई महापालिका हा वाद चांगलाच गाजला. पण, हा वाद कोर्टात गेल्यानंतर कंगना विरोधात बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेची तिजोरी तब्बल 82 लाखांनी खाली झाली. आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मुंबई महापालिकेची तिजोरी अशक्त झालीय. त्यात अशा वादांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांचा कराचा पैसा खर्च केला जात असेल तर ही उधळपट्टी नव्हे का असा सवाल आता केला जातोय.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या आणि मुंबईवर तोंडसुख घेणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे कार्यालय महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम केल्यानं तोडलं. या वादाचा बराच गाजावाजा झाला. कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. आता या प्रकरणी आपली बाजू कोर्टात मांडण्याऱ्या वकिलांवर मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती महापालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.
कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!
एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच महापालिकेची तिजोरी कमजोर झालीय. त्यात अशा वादांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांनी भरलेल्या कराचा पैसा जात असेल तर ही आर्थिक उधळपट्टीच म्हणावी लागेल, अशी टीका भाजपनं केलीय. मात्र, जर हा खर्च केला नसता तर कंगनाचीच बाजू सर्वांना खरी वाटली असती. कंगनावर एवढा पैसा खर्च करावा लागला याला जबाबदारही कंगनाची पाठराखण करणारेच आहेत, असं म्हणत सत्ताधारी शिवसेनेनं उलट भाजपलाच टोला लगावला.
कंगनावर मुबंई महापालिकेचा किती खर्च?
कंगना प्रकरणी महापालिकेची बाजू उच्च न्यायालयात मांडण्यासाठी अस्पी चिनॉय यांची वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना महापालिकेने 22 सप्टेंबर रोजी 3 वेळा 7 लाख 50 हजार तर 7 ऑक्टोबरला 8 वेळा 7 लाख 50 हजार रुपये असे एकूण 82 लाख 50 हजार रुपये फी म्हणून अदा केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कायदा विभागाने दिली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा काळ हा आधीच आर्थिकदृष्ट्या पाय खड्ड्यात नेणारा काळ. अशावेळी सामान्यांच्या कराचा पैसा हा खरंतर सामान्यांसाठीच वापरला जाणं जास्त महत्वाचं आहे. पण, एकीकडे कोरोना काळात अनेक जण सुविधांपासून वंचित राहतात आणि दुसरीकडे एका अभिनेत्रीसोबतच्या वादासाठी पैसा पाण्यासारखा खर्च केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
- 'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो? उर्मिला मातोंडकरांचा सवाल
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगनाकडून मराठीत ट्वीट
- मुंबईला ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना घरभेद्यांकडून बळ, संजय राऊतांची 'रोखठोक' टीका