मुंबई : सीएसएमटी पूल दुर्घटनेला एक महिनाही उलटला नसताना प्रशासनाने पुन्हा दोषी ऑडिटरच्या भरवशावर पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीएमवरील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज असोसिएट या कंपनीने दिलेल्या अहवालानुसार मुंबईतील धोकादायक पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबईमधील कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईचा पुन्हा सल्ला घेतला जाणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे  पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या 14 मार्च रोजी सीएसएमटी स्टेशनवरील हिमालय पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाल्याची घटना घडली. या हादरवून सोडणाऱ्या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘हिमालय’ पूल कोसळून झालेली दुर्घटना ‘बनावट’ स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडली असून यात सहा जणांना नाहक जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर दोषी कंपनीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटकही केली आहे. हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेस कंपनीला काळ्या यादीत टाकत पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आली. मात्र यानंतरही पालिकेकडून एबीसीडी आणि ई विभागातील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी डी.डी. देसाईचा सल्ला घेतला जाणार आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर ऑडिटर देसाईने केलेल्या इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असं असताना मुंबईतील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा सल्ला पुन्हा डी.डी. देसाई या कंपनी तयार केलेल्या ऑडिट नुसार होणार आहे. हिमालय दुर्घटनेनंतर डी डी देसाईने दिलेलं ऑडिट बनावट असल्याचं समोर आल्यावर पालिका पुन्हा इतर पुलांच्या दुरुस्ती साठी याच कंपनीचा सल्ला घेते कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणाऱ्या या प्रस्तावावर जोरदार वाद रंगण्याची शक्यता आहे. बनावट ठेकेदार डी डी देसाई कडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्ला -- * ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल * ऑपेरा हाऊस पूल * फ्रेंच पूल *  हाजीअली भुयारी मार्ग * फॅाकलॅन्ड रोड (डायनाब्रिज) * प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल * चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग * सीएसटी भुयारी मार्ग * ग्लोरिया चर्च उड्डाणपूल * सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल *  ईस्टर्न फ्रीवे * एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल * वाय. एम. उड्डाणपूल * सर पी डिमेलो पादचारी पूल *  डॅाकयार्ड रोड पादचारी पूल * चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग