मुंबई शहर आणि उपनगरात गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाहणी केली. मुंबईत रस्त्यारस्त्यांवर अनेक पदार्थात टाकला जाणारा बर्फ आणि बर्फाचं पाणी यांचे 74 टक्के नमुने दुषित आढळले आहेत. यामध्ये ज्यूस, बर्फाचे गोळे, पाणीपुरी यांचा समावेश आहे.
मुंबईत गॅस्ट्रोची मोठी साथ, दुषित पाण्याने उन्हाळ्यातच कहर
फेरीवाल्यांकडच्या पाण्याच्या नमुन्यात 10 टक्के पाणी दुषित असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे रस्त्यांवरुन बर्फ आणि बर्फाच्या पाण्याचे पदार्थ खाऊ नयेत, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या गॅस्ट्रो म्हणजेच अतिसाराच्या आजाराने भर उन्हाळ्यात डोकं वर काढलं आहे. मुंबईत जानेवारी ते एप्रिल दरम्यान गॅस्ट्रोचे 2 हजार 280 रुग्ण आढळले आहेत.
एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे सर्वाधिक म्हणजे 916 रुग्ण आढळले आहेत. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण वाढल्याचा अंदाज आहे.