BMC Standing Committee Meeting : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची मुदत आज 7 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची बैठक आज पार पडणार असून 160 अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची दाट शक्यता आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे हे प्रस्ताव असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार 8 मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे.  मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्यानंतर काही दशकांनतर पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. 


शेवटची स्थायी समिती बैठक वादळी ठरणार?


मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ही शेवटची स्थायी समितीची बैठक आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत जवळपास 180 प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील काही प्रस्तावांना भाजपने विरोध केला होता. त्यामुळे काही प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून स्थायी समितीमधील प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रयत्न असतील. तर, भाजपकडून याला विरोध होण्याची दाट शक्यता आहे. भाजपने याआधीच स्थायी समितीमधील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. 


यशवंत जाधव यांच्याविरोधात भाजप आक्रमक?


स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याने धाड टाकली होती. जवळपास चार दिवस आयकर विभागाने त्यांच्या घरी ठाण मांडले होते. जाधव यांच्याविरोधात असणाऱ्या कारवाईच्या मुद्यावरदेखील भाजपकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. 


काय असतील प्रस्ताव?


स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण, मलनि:सारण वाहिन्या,  जलाशय बोगदा. महापालिका रुग्णालयांसाठीचे विविध प्रस्ताव, अग्निशमन दलासाठीचा प्रस्ताव आदींचा समावेश आहे. 


इतर महत्त्वाची बातमी:


BMC Election : मुंबईत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांची शिवसेनेत लॉबिंग सुरु