मुंबई : मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या स्वयंघोषित समन्वयकांना 'मराठा क्रांती ठोक मोर्चा' धडा शिकवणार आहे. मराठा क्रांती मोर्चाची चळवळ बदनाम करणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्याचा निर्धार मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
कोपर्डी घटनेतील दोषींना न्यायालयाने 10 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. मात्र दहा महिने झाले तरी पुढील कोणतीच कारवाई झाली नसल्याची खंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाची चळवळ बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. काही स्वयंघोषित स्वयंसेवक या ठोक मोर्चात घुसले आणि परळी येथील आंदोलन मोडीत काढण्यासाठी मराठा समाजातील काही स्वयंघोषित समन्वयकांनी वेगवेगळी आंदोलने सुरु केली, असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाने सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बसणाऱ्या स्वयंसेवकांनी आंदोलने केल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आला. बंदमध्ये बाहेरील लोक घुसले आणि आंदोलन पेटवलं. परळीत शांततेत आंदोलन सुरु असताना नवी मुंबई, चाकण आणि विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करुन मराठा मोर्चाला बदनाम केलं गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
राजकीय पक्षांनी या स्वयंघोषित स्वयंसेवकांना मोर्चात घुसवलं. मराठा क्रांती मोर्चाची आचारसंहिता आहे, त्यानुसार आमदार, खासदारांना आंदोलनात स्थान नाही, मात्र तरीही काही ठिकाणी हे आमदार खासदार घुसले आणि आपले लोक या मोर्चात घुसवले, असंही त्यांनी म्हटलं.
ठोक मोर्चात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली.
लवकरच तुळजापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची बैठक होईल, त्यात क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरेल, अशी माहिती देण्यात आली. तर मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वयंघोषित समन्वयकांपासून समाजाने सावध रहावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सुरेश पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठा क्रांती पक्षाला समाजाची मान्यता नाही. त्यांना पक्ष स्थापन करायचा होता तर त्यांनी समाजाला विचारायला हवे होते, जिल्हा जिल्ह्यात जायला हवे होते. या पक्षाला समाजाची मान्यता नाही, कारण मराठा समाज कधीही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.
मराठा समाज एकत्र झाला तर राजकीय पक्षांना धोका आहे, त्यामुळे हा समाज एकवटू देत नाही. त्यामुळेच समाजात फूट पाडली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
स्वयंघोषित समन्वयकांना धडा शिकवणार : मराठा क्रांती ठोक मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2018 09:46 PM (IST)
मराठा क्रांती मोर्चाची चळवळ बदनाम करणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकवण्याचा निर्धार मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -