मुंबई : बहुप्रतिक्षित असा मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (2034) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजपर्यंत 13.59 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे. यात विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर 46.55 लाख खर्च झाले आहेत तर सूचना व हरकती सुनावणीसाठी आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या 3 माजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधन आणि सुविधांवर 20 लाख खर्च करण्यात आले आहेत.

मुंबईचे आयुक्त सिताराम कुंटे यांच्या कारकिर्दीत तयार केलेला मुंबईचा प्रारुप विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्दबातल केला होता. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (2034) पुर्नरचनेसाठी आजपर्यंत 13 कोटी 59 लाख आणि 56 हजार खर्च करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित केलेल्या मुंबईचा प्रारुप विकास आराखडयावर (2034) 5 कोटी 60 लाख 5 हजार खर्च केले आहेत.

25 फेब्रुवारी 2015 रोजी प्रकाशित आराखडयाच्या कामासाठी नेमलेले सल्लागार मेसर्स इजिस जियोप्लानला 3.42 कोटी अदा केले आहेत. एमबी ग्राफिक्स आणि प्रिंटमोअर या कंपनीला 96 लाख, मेसर्स एडीसीसीला 1 कोटी 13 लाख, वीके पाठक सल्लागार आणि इन्फॉरमल समितीच्या सदस्यांना 7 लाख 90 हजार आणि मेसर्स विदर्भ इन्फोटेकला 2015 मध्ये स्वीकारलेल्या सूचना आणि हरकतीच्या अनुषंगाने डेटा एंट्री कामासाठी 16 लाख अदा केले आहेत.

सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2015 मध्ये एकूण 1.91 कोटी खर्च केले गेले आहेत. विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांच्या मे 2015 पासून मे 2016 या कालावधीत वेतनावर 16.55 लाख खर्च झाले आहेत. त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या संगणकावर 46 हजार खर्च केले आहेत तर कंसल्टेट फॉर डीसीआर टीमचे कांजलकर यांस 3 लाख 70 हजार आणि इंफॉर्मल समितीच्या सदस्यांना 2 लाख दिले आहे. मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे उपलब्ध केलेल्या विविध प्रकारच्या मनुष्यबळासाठी 3 कोटी 5 लाख 55 हजार अदा केले आहे. बॅटरी बॅकअपसाठी मेसर्स एनएम सिस्टमला 29 हजार अदा केले आहेत.

27  मे 2016 राजी प्रकाशित सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 मध्ये 6 कोटी 8 लाख 6 हजार खर्च करण्यात आले आहे. यात विशेष कार्य अधिकारी असलेले रमानाथ झा यांस जून 2016 पासून सप्टेंबर 2018 या कालावधीत वेतन रुपाने 40 लाख अदा केले आहेत. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत प्राप्त सूचना आणि हरकतीवर आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या समितीच्या 3 सदस्यांवर 19 लाख 99 हजार खर्च करण्यात आले असून यात सर्वश्री गौतम चटर्जी, सुरेश सुर्वे आणि सुधीर घाटे यांचा समावेश आहे.

मुंबईचा प्रारुप विकास आराखडा अंतर्गत जाहिरातींवर 14.83 लाख खर्च करण्यात आले आहेत. तर जेवणावर 2 लाख 83 हजार खर्च करण्यात आले आहेत. यात 31 जुलै 2017 रोजी महापालिकेच्या मंजूरीच्या अनुषंगाने महापालिका सदस्यांना भोजन व्यवस्थेवर 1 लाख 65 हजार खर्च करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 प्रदर्शित करण्यासाठी परवाना खरेदी करण्यासाठी मेसर्स आर्क जीआयएस सर्वर एंडहांस इंटरप्राइजेस या कंपनीला 1 कोटी 26 लाख अदा करण्यात आले आहे. सुधारित मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034  याचा नकाशा प्रिंटिंग करण्यासाठी 46 लाख 9  हजार मेसर्स जयंत प्रिंटरी एलएलपी या कंपनीला अदा करण्यात आले आहे. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा 2014-2034 च्या अनुषंगाने तातडीच्या कामासाठी 10 लाख 57 हजार खर्च करण्यात आले आहे.