मुंबई : महानगरपालिका मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर पालिका प्रशासनाने गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल 120 कोटी रुपये खर्च केले आहेत. पालिकेने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआयला उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे. पालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्ती आणि नुननीकरणासाठी पाच वर्षात पालिकेने चार वेगवेगळे कंत्राट बहाल केले. त्यासाठी पालिकेने पाण्यासारख्या पैसा खर्च केला आहे. पालिकेने तब्बल 120 कोटी 61 लाख 41 हजार 932 रुपये खर्च केले आहेत. यापैकी 111 कोटी 73 लाख 82 हजार 561 रुपये हे मेसर्स कॅन्स्ट्कॅशन टेक्निक, मेसर्स ग्लास सेन्सेशन, मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या 4 कंत्राटदारांना अदा करण्यात आले आहेत. उरलेले 8 कोटी 87 लाख 59 हजार 370 रुपये अद्याप देण्यात आले नाहीत. मुख्य इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मेसर्स आभा नारायण लांबा असोसिएटस, मेसर्स एस. जे. के. आर्किटेक्ट्स आणि मेसर्स शशी प्रभू एड असोसिएटस यांच्या संयुक्त उपक्रमातर्फे तयार करण्यात आलेल्या कामांच्या यादीमध्ये दगडी भिंतीची पुनर्स्थापना, व्हरांडा व जिन्यातील लाकडी सांध्यांचे संरचनात्मक जतन व मजबुतीकरण, छताची दुरुस्ती याचा समावेश होता. सदर काम हे मेसर्स कॅन्स्ट्कॅशन टेक्निक या कंत्राटदारास 7 कोटी 31 लाख 17 हजार 805 रुपये इतक्या रकमेस मे 2008 रोजी देण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील मुख्य इमारतीच्या रंगीत काचांची पुनर्स्थापना करण्याचे काम ऑगस्ट 2010 मध्ये मंजूर करत मेसर्स ग्लास सेन्सेशन या कंत्राटदार कंपनीला 82 लाख 52 हजार 909 रुपयांत देण्यात आले. ऑक्टोबर 2011 रोजी मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास 68.77 कोटी रुपये देण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामाचा यात समावेश आहे. तर मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील मुख्य इमारतीच्या नूतनीकरण कामाचे 43 कोटी 70 लाख 71 हजार 218 रुपयांचे कंत्राट मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास जून 2012 रोजी देण्यात आले. याव्यतिरिक्त सल्लागार आणि आर्किटेक्टला दिलेल्या पैशांची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.