मुंबई: मालाड इथल्या मढ स्टुडिओतील (Madh Studio) शूटिंग तात्काळ बंद करावं, त्याचा इतर सर्व वापर बंद करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस मुंबई महापालिकेने (BMC) जारी केली आहे. ही नोटीस मुंबई महापालिकेने स्टुडिओ मालकाला दिली आहे. मढ स्टुडिओ घोटाळ्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
या संदर्भात मुंबई महानगर पालिकेने आज एक नोटीस जारी केली आहे. या स्टुडिओतील (Madh Studio) शूटिंग बंद करण्यात यावं, तसेच या स्टुडिओचा इतर कारणांसाठी होणार वापर बंद करावा असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या आदेशाचं पालन केलं नाही तर महापालिका नियमाप्रमाणे उचित कारवाई करेल असंही या आदेशात म्हटलं आहे.
पर्यावरण विभागानं या ठिकाणी सहा महिन्यासाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवनगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ या ठिकाणी उभा राहिल्याचा आरोप किरीट सोमय्यांचा केला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांच्या भागिदारीमध्ये हा स्टुडिओ उभारण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (23 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi) मंत्री राहिलेल्या अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या (Mumbai) मढ मार्वे येथील सीआरझेड जमिनीवरील अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती. ज्यात एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान, या स्टुडिओची पाहणी करण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या सोबत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Aaditya Thackeray : सोमय्यांचे आरोप अस्लम शेख यांच्यावर, निशाणा मात्र आदित्य ठाकरे यांच्यावर
- Kirit Somaiya: मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा, सोमय्यांकडून पाहणी; अस्लम शेख, आदित्य ठाकरेंवर निशाणा