Aaditya Thackeray : नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या रडारवर सध्या महाविकास आघाडीतील मंत्री आहेत. माजी मंत्र्यांवर आरोप होत असतांना निशाण्यावर मात्र शिवसेना आहे. सध्या भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी अस्लम शेख यांच्या खांद्यावर बंदुक ठेवत निशाणा थेट आदित्य ठाकरेंवर लावलाय...


सध्या भाजपकडून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय. एकीकडे किरीट सोमैय्या यांनी मालवणी-मढ भागातील कथित अनधिकृत स्टुडीओ प्रकरणावरुन माजी मंत्री अस्लम शेख यांच्यासोबतच आदित्य ठाकरेंवरही आरोप केलेत. तर,दुसरीकडे नितेश राणेंनीही अभिनेता डिनो मौर्या यांचं नाव घेत बीएमसीतील अनेक कंत्राटे आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांनी डिनो मौर्यांच्या सांगण्यावरुन दिली असे आरोप केले आहेत. 


संजय राऊतांनंतर आता निशाण्यावर थेट मातोश्री आणि ते ही आदित्य ठाकरे आहेत हे चित्र पावसाळी अधिवेशनातच पाहायला मिळालं. याकरताच किरीट सोमैय्यांचा मालावणी-मढ मधील अनधिकृत स्टुडीओ प्रकरणात बंदुक अस्लम शेख यांच्या खांद्यावर ठेवत निशाणा आदित्य ठाकरेंवर लावण्याचा प्रयत्न आहे...
 
कथित अनधिकृत स्टुडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध कसा? 
 मागील दोन वर्षात मालवणी मढ भागात अस्लम शेखांच्या आशिर्वादानं दहा लाख स्क्वेअर फुट जागेवर 28 कमर्शिअल स्टुडीओचं बांधकाम झालं आहे. यांपैकी पाच स्टुडीओ सीआरझेड मध्ये असल्याचा आरोप किरीट सौमैय्या यांनी केलाय.  2019 मध्ये हिरवीगार असलेली जागा 2021 मध्ये सिआरझेडमध्ये नसल्याचा पर्यावरण मंत्रालयाचा निर्वाळा मिळाला. आदित्य ठाकरेंनी मालवणी-मढ भागातील त्या जागेवर भेट दिली होती. मात्र, आरेवरुन रान उठवणा-या आदित्य ठाकरेंनी मालवणी-मढ मध्ये मॅन्ग्रोजची कत्तल कशी होऊ दिली, असेही किरीट सोमैय्या म्हणाले. 
 
एकीकडे किरीट सोमैय्यांनी मालवणी-मढ मधील स्टुडीओ प्रकरण लावून धरलंय तर दुसरीकडे भाजपच्याच  नितेश राणेंनीही आदित्य ठाकरे आणि डिनो मौर्या यांच्या जवळीकीवरुन आरोप  केलेत. कोरोना काळात माणसं मरत होती तेव्हा आदित्य ठाकरे अभिनेता डिनो मौर्यांसोबत मिटींग करत होते असा आरोप यापूर्वीच नितेश राणेंनी केलाय. तर आता , बीएमसीतील कोविड काळातील अनेक कंत्राटे डिनो मौर्यांच्या सांगण्यावरुनच आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादानं कंत्राटदारांना मिळाली असाही आरोप नितेश राणेंनी केलाय. 


शिंदे गट फुटल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संघटना मजबूतीकरता पायाला भिंगरी लावलीय...निष्ठा यात्रेतून महाराष्ट्र पिंजुन काढण्याचं काम आदित्य ठाकरेंनी हातात घेतलंय. उद्धव ठाकरेंची तब्येत आणि मातोश्रीच्या निकटवर्तीय संजय राऊत यांची अटक यांमुळे शिवसेनेचं धनुष्ययाबाण अवघड परिस्थितीत आदित्य ठाकरेंच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हद्दपार करायचं असेल तर भाजपनं आपल्या बाणाच्या निशाण्यावर थेट आदित्य ठाकरेंनाच ठेवायचं असं ठरवलेलं दिसतंय.