मुंबई: मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीच गैरहजेरी लावली. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासोबतच्य कुरबुरीमुळे महापौरांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या "स्वच्छता हीच सेवा" या अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. मात्र आयुक्त आपल्याला महापालिकेच्या कार्यक्रमांबाबत माहितीच देत नाही. आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही सर्वात शेवटी काल संध्याकाळी देण्यात आले, म्हणून मी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या महापालिकेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहून महापौरांनी प्रोटोकॉल मोडला आहे. महापालिकेच्या कार्यक्रमाला महापौरांनी उपस्थित राहणं अनिवार्य असतं, मात्र महापौर महाडेश्वर यांनी आयुक्तांसोबतच्या वादामुळे या कार्यक्रमालाच दांडी मारली.
दरम्यान, या कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासह शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजप आमदार राज पुरोहित यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.