मुंबईत अपक्ष नगरसेवकांची साथ लाभल्याने शिवसेनेचं संख्याबळ 87 वर पोहचलं आहे, तर भाजपच्या पारड्यात 82 जागा आहेत. दोन्ही पक्षांमध्ये फारसं अंतर नसल्यामुळे बहुमतासाठी दोन्ही पक्ष जुळवाजुळव करतील.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी विशेष सत्र बोलावलं आहे. 9 मार्चला मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे नगरसेवक आपलं मत कोणाच्या बाजुने टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे भाजपला आपला एक नंबरचा शत्रू मानतात. त्याचप्रमाणे निवडणुकांपूर्वी मनसेने शिवसेनेकडे बिनशर्त युतीसाठी टाळी मागितली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा कल शिवसेनेकडे असेल, असं सूत्र सांगतात.
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मात्र शिवसेनेने युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर राज ठाकरेंनी सेनेसोबत जाण्याचा मार्ग बंद केला होता. राज या भूमिकेवर ठाम राहिल्यास महापालिकेत ते काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शिवसेनेने सशर्त पाठिंबा मागितल्यास मतदान करण्याऐवजी काँग्रेस महापालिकेतून वॉक आऊट करु शकतं. त्यावेळी मनसेच्या 'सात'ची 'साथ' ही शिवसेनेला भासू शकते. त्यामुळे मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणता पक्ष कोणती पावलं टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.