मुंबई : 'कोविड 19' या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे 48 तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश 8 जूनला आदेश देण्यात आले होते. अद्यापही कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती निर्धारित वेळेत कळवलेली नसल्यास संबंधित रुग्णालयांना महापालिकेद्वारे शेवटची संधी देण्यात आली आहे.
यानुसार मृत्यूनंतर 48 तास उलटून गेलेल्या कोविड बाधित मृत्यूंची माहिती महापालिकेकडे कळविण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अशा रुग्णालयांना आता शेवटची संधी दिली आहे. ज्यानुसार एखाद्या रुग्णालयाच्या स्तरावर अशी माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी सदर माहिती 48 तासात बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे कळवावयाची आहे. शेवटची संधी देऊनही कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा 1897' अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
राज्यात आज 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 67, भिवंडी 27, ठाणे 4, वसई विरार 1, नागपूर मनपा येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
- कोरोनाविरोधातील लढाईत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग महत्वाचा : मुंबई महापालिका आयुक्त
- नवी मुंबईत चमकोगिरी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून कोरोना स्क्रीनिंगमध्ये लुडबुड!