नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या मास स्क्रिनिंगमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे मास स्क्रीनिंग करणाऱ्या डॉक्टरांच्या अडचणी वाढल्या आहेत. मास स्क्रीनिंगवेळी राजकीय कार्यकर्त्यांच्या चमकोगिरी फोटोशुटसाठी कोरोना स्क्रीनिंगमध्ये लुडबुड वाढली आहे. विविध पक्षांच्या बॅनरबाजीमुळे आपापसात वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांना आयुक्तांनी समज दिली आहे.


नवी मुंबई शहरामध्ये कोपरखैरणे, घणसोली आणि महापे हे कोरोनाचे व्हाट्स स्पॉट ठरले आहेत. त्यामुळे या भागात महापालिका प्रशासनाने मास स्क्रीनिंग सुरू केले आहे. कंटेनमेंट झोन असलेल्या भागात रोज महानगरपालिका 1 हजार ते 2 हजार लोकांचे स्क्रीनिंग करीत आहेत. कोरोना बाबत आढळणाऱ्या सर्व लक्षणांची तपासणी करत आहे. मात्र, या स्क्रीनिंगचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक, विविध राजकिय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते लुडबुड करीत आहेत.


कोरोना रुग्णांसाठी मुंबईत अवाढव्य ऑक्सिजन टाक्यांची महापालिकेकडून व्यवस्था


श्रेयवादासाठी वैद्यकीय कामात लुडबुड
कोरोनाबाबत अत्यंत खरबरादी घेवून डॉक्टर, नर्स , वॉर्ड बॉय यांना काम करावे लागत असताना राजकीय कार्यकर्त्यांच्या चमकोगिरीमुळे आरोग्य व्यवस्थेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढील काळात होणार असल्याने येथील जनतेचा कैवारी आपणच असल्याचे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न राजकीय मंडळी करीत आहेत. ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार' या म्हणीप्रमाणे लोकांची आरोग्य तपासणी मनपा प्रशासन करीत असताना क्रेडीट मात्र आपल्याला मिळावे याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यासाठी बॅनरबाजी सुध्दा केली जात आहे.


आयुक्ताकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तक्रार
या राजकीय श्रेय घेण्याच्या नादात काही काही प्रभागांमध्ये आपआपसात वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स यांनी आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार केली आहे. मास स्क्रीनिंगमध्ये येत असलेल्या या अडथळ्यांवर महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मास स्क्रीनिंग करणाऱ्या डॉक्टरांना आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास होईल, असे वर्तन राजकीय कार्यकर्त्यांनी करू नये असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


Lockdown Effect | अटी-नियमांसह जिम सुरु करण्यास परवानगी द्या : जिम व्यवसायिक