मुंबई :  मुंबईतील रस्ते घोटाळ्याच्या कंत्राटदारांवर महापालिका मेहरबान झाली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण, रस्ते घोटाळा प्रकरणी ज्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली, त्या घोटाळेबाज कंत्राटदाराच्या पत्नीच्या नावे मुंबईतील महत्वाच्या रस्तांची कामं सोपवली जात असल्याचं समोर आलं आहे.


2016 मध्ये मुंबईतील रस्ते घोटाळा चांगलाच गाजला होता. या घोटाळ्याप्रकरणी अभियंत्यांवर किरकोळ कलमांसह आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तर आर. ई. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारवर कारवाईही करण्यात आली होती.

या घोटाळ्यावरुन महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मात्र, आता हा सर्व प्रकार महापालिका विसरली आहे की, त्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

कारण, रस्ते घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये आर. ई. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीचाही समावेश होता. मात्र, आता या घोटाळेबाज कंत्राटदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या मेसर्स फोर्सला मुंबईतील महत्वाच्या रस्तांची कामं सोपवली जात आहेत.

या रस्तेकामाचं कंत्रात तब्बल 20 कोटी 49 लाख रुपयांचं आहे. त्यामुळे मुंबई महापालिका अशा कंत्राटदारांवर मेहरबान का? असा सवाल आता विचारला जात आहे.