मुंबई: फेब्रुवारी 2017मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगू लागला आहे. मुंबई महापालिकेवर सुमारे दोन दशकांपासून शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. 1995 नंतर भाजपने युती करून सत्तेत सहभागी झाले. पण 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपला मिळावलेल्या वर्चस्वामुळे मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाची खुर्ची खुणावते आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवून महापौरपदी भाजपचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार आज झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.


 

आजच्या भाजपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजानिक बांधकाममंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, पुनम महाजन यांच्यासह मुंबईतील भाजपचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीवेळी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी अशिष शेलार यांची पुन्हा निवड करण्यात आली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी 114+ चे ध्येय समोर ठेऊन स्वबळावरच निवडणूक लढण्याचा निर्धार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

 

अशिष शेलार यांच्या फेरनियुक्तीनंतर बोलताना त्यांनीही महापालिकेत शतप्रतिशत भाजपचा नारा दिला. ते म्हणाले की, ''2016-18 या कार्यकाळासाठी पक्षाने माझीच फेर नियुक्ती का केली हे सांगण्याची गरज नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जे चुकले ते शतप्रतिशत भाजपचे स्वप्न आगामी महापालिका निवडणुकीत साकार करणारच,'' असा निर्धार व्यक्त केला.

 

गेल्या काही दिवसांपासून सेना- भाजपतील वादाने अक्षरश: टोक गाठले होते. प्रकाश मेहतांच्या सिंहावरून सुरू झालेल्या या कुरबुरी थेट निजामा, सालार जंग, कासिम रिझवी, आसरानीपर्यंत येऊन थडकल्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातही शिवसैनिकांनी स्वबळावर निवडणुक लढण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावेळीच या निवडणुकीत सेना-भाजपसोबत युती करण्यासाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण, आज झालेल्या भाजपच्या मेळाव्यातही भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने ही निवडणुक दोन्ही पक्ष स्वतंत्रच लढतील हे स्पष्ट झाले आहे.

 

सध्या महापालिके शिवसेना- भाजपची सत्ता असून शिवसेनेचे 75, तर भाजपचे 31 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत भाजपने 114+ चा नारा देऊन सेनेला एकटे पाडले आहे. काल झालेल्या केंद्रातील मंत्रीमंडळ विस्तारातही भाजपने दलित मतांवर डोळा ठेऊन रामदास आठवलेंना मंत्रिमंडळात सामावून घेतले. त्यामुळे आता भाजपने महापालिकेसाठी व्यूहरचना केली असल्याचे दिसते.