Mumbai News: हवेतील प्रदूषणावरून (Air Pollution) उच्च न्यायालयाने (High Court) फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासन चांगलंच सतर्क झालंय. यानंतर मुंबईतील (Mumbai News) सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय आता महापालिका प्रशासनाने घेतला आहे. धूळ नियंत्रणासाठी 121 टँकरसह इतर संयंत्रांचा वापर करण्यात येणारेय. 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फूटपाथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास सुरुवात झालीये. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही. तसेच वारंवार होणारं हवेचं प्रदुषण आणि धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फुटपाथ पाण्यानं धुतले जाणार
हवेतील प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेनं अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आखल्या आहेत. याअंतर्गत सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे फुटपाथ स्वच्छ करुन ते पाण्यानं धुवून काढण्याची कामं वेगानं केली जात आहेत. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे 550 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी पाण्याचे 121 टँकर आणि इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्यानं वापर केल्यानं पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, वायू प्रदुषणाच्या निरनिराळ्या उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी 3 नोव्हेंबरला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली, यामध्ये वायूप्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्यानं धूळ नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं सक्रिय पावलं उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर ही कामं सुरू करण्यात आली आहेत.
रस्ते आणि फुटपाथ स्वच्छ करणं प्राधान्याचा विषय
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांनुसार, रस्ते आणि फुटपाथ पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (vehicle mounted anti-smog machines) कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगानं केली जात आहे. संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे 650 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी पाण्याचे 121 टँकर आणि इतर संयंत्र, मनुष्यबळ नेमण्यात आलं आहे.