BMC Covid Scam : मुंबई (Mumbai) कथित जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी (Covid Scam) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सुजित पाटकर यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सुजित पाटकर (Sujit Patkar) हे लाईफलाइन हॉस्पिटलच्या भागीदारांपैकी एक आहेत. त्यांना कोविड हॉस्पिटलचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आले होते. सुजित पाटकर यांना गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची EOW कोठडी सुनावली आहे. सुजित पाटकर यांना गेल्या महिन्यात ईडीकडून अटक करण्यात आली होती.
आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास
सुजित पाटकर यांच्यासह डॉ. किशोर बिसुरे यांना देखील ईडीने अटक केली होती. पाटकर हे ईडी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. पण आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमधून EOW कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय नेत्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ईडीनंतर आता आर्थिक गुन्हे शाखा सुजित पाटकर यांचा तपास करणार आहे.
ईडीचा दावा काय?
सुजित पाटकर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना राजकीय नेतांच्या प्रभावामुळे कोविड सेंटरचे काम मिळाल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत होता. तसेच, याबद्दल स्वत: सुजित पाटकर यांनी खुलासा केला असल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तर या लाईफलाईन रुग्णालयांमध्ये कोविड कालावधीत अनेक आर्थिक घोटाळे झाले असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या प्रकरणात अनेक गैरव्यवहार झाल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणात आणखी कोणती माहिती सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माजी महापौरांवर गुन्हे दाखल
मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध विभागातील अधिकाऱ्यांची आता एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कोविड काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्स या अतिरिक्त दरात खरेदी करण्यात आल्याचं अहवालातून समोर आलं आहे. या बॅग्जची किंमत ही जवळपास 1800 ते 2000 रुपये इतकी असताना मुंबई महानगरपालिकेने या बॅग्ज 6800 रुपये किंमतीने विकत खरेदी केल्या. तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून बॉडीबॅग खरेदीचे कंत्राट देण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.