BMC Covid Scam :  मुंबई महापालिकेने कोरोना काळात (BMC Covid Scam) दिलेल्या कंत्राटाची मुंबई पोलीस आणि सक्त वसुली संचालनालयाकडून कसून चौकशी सुरू असताना कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये मुंबई महापालिकेच्या (BMC) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त या दोघांवरील गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची एसआयटीकडून चौकशी होत असताना मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे.


कॅगकडून चौकशी झाल्यानंतर अहवाल समोर आला. त्यातच ईडीने छापेमारी केली. राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील कंत्राटाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली. ईडीने कोविड हॉस्पिटल घोटाळा प्रकरणात काहींना अटकही केली. 


कोरोना काळात मुंबई महापालिकेने केलेल्या व्यवहाराची कसून चौकशी सुरू असताना त्यात कोरोना काळात खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आला आणि त्यामुळेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


>> नेमका हा कथित बॉडी बॅग घोटाळा आहे काय?


- कोरोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्स या वाढीव दराने खरेदी करण्यात आल्या


- 1800 ते 2000 किमतीच्या बॉडी बॅग्स या 6800 रुपये किमतीने मुंबई महापालिकेने खरेदी केल्या. 


-  बॉडीबॅग खरेदीचे कंत्राट माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरून देण्यात आल्याचा ईडीच्या तपासात समोर आलं होतं


- तर मुंबई पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता पेडणेकर या महापौर असताना मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे कंत्राट एका विशिष्ट कंपनीला द्यावं अस सांगण्यात आलं. 


- मात्र,  किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असून महापौरांना या संदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकार नसल्याचे म्हटले आहे


या सगळ्या प्रकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून मुंबई महापालिकेचे मुख्यालय त्यासोबतच मुंबई महापालिकेचे केंद्रीय खरेदी विभाग त्या ठिकाणी जाऊन त्यासोबतच बीएमसी अधिकाऱ्यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलून या प्रकरणाच्या आणि संबंधित व्यवहाराच्या खोलात जाऊन तपास केला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. 


कोरोना काळात मुंबई महापालिकेने जो व्यवहार केला त्या व्यवहारासंबंधी चौकशी ईडी आणि एसआयटीकडून केली जात असताना अनेक अधिकाऱ्यांचे जवाब नोंदवले जात आहेत. या जबाबातूनच मोठे खुलासे समोर येत आहेत. आणखी कोणते मोठे नाव समोर येणार हे या चौकशीअंती बाहेर येईल.