मुंबई : अंधेरीतील दुर्घटना झालेल्या पुलाचं नोव्हेंबर आणि एप्रिलमध्येच ऑडिट करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. ‘ऑडिटवेळी दुरुस्तीच्या काही गोष्टी होत्या पण त्यामुळे पूल पडेल असं वाटत नव्हतं’, असं अजब वक्तव्य पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.


अंधेरीतील पुलाचा पादचारी भाग कोसळल्यानंतर महानगरपालिका आणि रेल्वे आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहेत. पण या दोन्ही व्यवस्थांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि एप्रिलमध्ये या पुलाचं ऑडिट झालं होतं. नोव्हेंबरमध्ये बीएमसी आणि रेल्वे या दोघांनी एकत्र तर, एप्रिलमध्ये पश्चिम रेल्वेने मान्सूनपूर्व ऑडिट केलं होते.

‘आम्हाला ऑडिटवेळी मोठी धोकादायक गोष्ट दिसली नाही. दुरुस्तीच्या लहान गोष्टी होत्या, गंजदेखील होता पण त्यामुळे पूल पडेल असं वाटलं नाही,’ असं धक्कादायक विधान पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलं आहे.

अंधेरीतील या गोखले पुलाला मोठ्या प्रमाणात गंज चढला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं होतं. “गंज लागला की लवकरात लवकर तो पूल पाडायला हवा. त्यासाठी गरज असेल तर विशेष ब्लॉक घेतला जावा. कारण प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे”, असं मत रेल्वे बोर्डाचे माजी अधिकारी सुबोध जैन यांनी व्यक्त केलं आहे.

रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनामध्ये समन्वयचा अभाव असल्यानेच प्रवासी सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष केलं जात आहे, असं मुंबईकरांनी म्हटलं आहे.