मुंबई: आपलं घर सुंदर ठेवायचं आणि कचरा मात्र शेजारच्याच्या दारात किंवा सार्वजनिक रस्त्यावर टाकायचा ही अनेकांची मानसिकता असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणाहून जाताना आपल्याला अनेकदा नाक धरून जावं लागतं. अशाच प्रवृत्तीच्या एका पठ्ठ्याने त्याच्याकडील कचरा चक्क गेट वे ऑफ इंडियाच्या (Gateway of India) समुद्रात टाकला. पण पोलिसांनी आणि महापालिकेने त्याला शोधून काढलं (BMC Action On Viral Video) आणि 10 हजारांचा दंड ठोठावला. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेले छायाचित्र हे समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. अनेक नागरिक तसेच मान्यवरांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला होता. या छायचित्राचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी सदर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. कचरा घेऊन आलेल्या टॅक्सीचा नंबर काढून सदर व्यक्तीची ओळख पटवणे शक्य झाले. त्यानंतर या व्यक्तिला ए विभागातील घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे.


गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात कचरा फेकला


मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया म्हणजे नेहमी पर्यटकांनी गजबजलेलं ठिकाण. या ठिकाणी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात आणि पर्यटनाचा आनंद लुटतात. मात्र एक व्यक्ती टॅक्सीतून गेट वे ऑफ इंडियाजवळ आला. त्या व्यक्तीने त्याच्यासोबत मोठा कचरा आणला होता. तो सर्व कचरा त्या व्यक्तीने निर्लज्जपणे समुद्रात फेकून दिला. त्यानंतर तो निघून घेला. मात्र कुणीतरी त्याचा एक फोटो काढला. 


 




हा व्यक्ती समुद्रात कचरा टाकतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. एकीकडे स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई ही मोहीम राबवली जात असताना दुसरीकडे असं बेजबाबदार माणसं मुंबई घाण करताना दिसत आहेत. सुरूवातीला हा व्यक्ती कोण आहे याची काहीच माहिती समोर येत नव्हती. 


पोलिसांनी नंतर तो व्यक्ती ज्या टॅक्सीतून आला होता त्याचा नंबर मिळवला आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीचा माग काढला. तो व्यक्ती सापडल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आणि महापालिकेने त्याला 10 हजारांचा दंड ठोठावला. 


ही बातमी वाचा: