मुंबई : कमला मिल्स आगीनंतर मुंबई महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता मुंबईतील बैकायदेशीर हॉटेल्स आणि आस्थापनांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात एकाच दिवसी 53 ठिकाणी पालिकेने कारवाई केली.


मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत आणि बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अनियमिततांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

याबाबत महापालिकेच्या 'इ', 'एन' आणि 'जी दक्षिण' या तीन विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज तिन्ही विभागात 134 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 53 ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर 'इ' विभागातील नायर मार्गावर 'शोले हुक्का पार्लर'वर धडक कारवाई करण्यात येऊन 50 हुक्का आणि संबंधित साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले आहे.

आजच्या कारवाई दरम्यान 'इ' विभागात 47 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी 20 ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली. यामध्ये जमजम हॉटेल व किंग कबाब या उपहारगृहांचा समावेश आहे. याच कारवाई दरम्यान विनापरवानगी साठा केलेले 23 सिलिंडर जप्त करण्यात आले.

'जी दक्षिण' विभागात 41 आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन अनियमितता आढळलेल्या 15 ठिकाणी निष्कासन कारवाई करण्यात आली. यामध्ये रघुवंशी मिलमधील शिशा रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. याच विभागातून 10 सिलिंडर देखील जप्त करण्यात आले. तर 'एन'विभागात 46 ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 18 ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच 18 सिलिंडर देखील जप्त करण्यात आले आहेत.