मुंबई : मुंबई सीएसएमटीतील हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिली आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिटरवर दुर्घटनेचे खापर फोडणाऱ्या प्रशासनाचा हलगर्जीपणाही या घटनेला कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे.


या पुलाच्या दुरुस्तीचा डी. डी. देसाई कंपनीचा अहवाल सप्टेंबर 2016 मध्ये आला होता. या पुलाची स्थिती चांगली असल्याचं अहवालात म्हटलं असलं, तरी काही किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं.

14 मार्च 2019 रोजी सीएसएमटी स्टेशनजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळून 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 31 जण जखमी झाले होते.

डी डी देसाई कंपनीनं सुचवलेल्या कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी आणि भायखळा या वर्दळीच्या भागातील 16 पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी 13 कोटी 86 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

डी. डी देसाई कंपनीच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सल्ल्याने नियुक्त करण्यात आलेल्या जैन इन्फ्रास्ट्रक्चरला बांधकामाचा ठेका देण्यात येणार असला, तरी या कामाचे मूल्यमापन आयआयटी आणि व्हीजेटीआय करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हिमालय पुलासाठी या दुरुस्त्या सुचवल्या होत्या -

हिमालय पूल चांगल्या स्थितीत आहे. मात्र पायर्‍या, पायर्‍यांचे स्क्रू तुटलेले होते. चालण्यासाठी बनवलेल्या काँक्रिटच्या स्लॅबवर गंज पकडलेला आहे. बाजूच्या रेलिंगला तडे गेले होते. त्यामुळे त्याला गंज लागणार नाही, असे पेटिंग करावे, जाळ्या बदलायला हव्यात, पायर्‍या दुरुस्त कराव्यात अशा सूचनाही केल्या होत्या.

'या' 16 पुलांची होणार दुरुस्ती

-- ग्रॅन्टरोड रेल्वेवरील पूल
-- ऑपेरा हाऊस पूल
-- फ्रेंच पूल
--  हाजीअली भुयारी मार्ग
-- फॅाकलॅन्ड रोड (डायना ब्रिज)
-- प्रिसेंस स्ट्रीट पादचारी पूल
--- चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग
-- सीएसएमटी भुयारी मार्ग
--- ग्लोरिया चर्च उड्डाणपूल
-- सीताराम सेलम वाय ब्रीज उड्डाणपूल
---  ईस्टर्न फ्रीवे
-- एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल
--- वाय. एम. उड्डाणपूल
-- सर पी डिमेलो पादचारी पूल
--  डॅाकयार्ड रोड पादचारी पूल
--- चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग