नवी मुंबई : आपण सर्वांनी लहानपणी निळ्या कोल्ह्याची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. पण अशीच काहीशी घटना नवी मुंबईतील तळोजा भागात घडली आहे. नवी मुंबईतल्या तळोजामध्ये सध्या काही निळ्या रंगाचे कुत्रे वावरत आहे. पण निळ्या रंगाचा हा कुत्रा पाहून अनेकांना कुत्र्याची ही नवी जात आहे का? या प्रश्नाने त्रस्त केलं आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये रंग तयार करणाऱ्या कंपन्या बहुसंख्या आहेत. या कंपन्यांमधून प्रदूषित पाणी जवळच्या कासाडी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील भटक्या कुत्र्यांवर याचा वाईट परिणाम होत आहे. तळोजामध्ये अशाच प्रकारे रासायनिक परिणामामुळे निळे झालेले कुत्रे फिरत असल्याचे पाहून स्थानिकांना कुत्र्याची ही नवी प्रजात आली कुठून? असा प्रश्न पडत आहे.
वास्तविक, कुत्र्याच्या अंगाला केमिकलयुक्त निळा रंग लागला असून, पावसातही ते अंगावरून निघत नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. अंगावर लागलेले रंगामुळे कुत्र्यांना त्वचा रोगाला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर हे रंग चाटल्याने त्यांना पोटाचे विकार होवू शकतात.
दरम्यान, तळोजामधील कासाडी नदी परिसरातील अनेक रासायनिक कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम माश्यांच्या प्रजनन क्रियेवर झाला आहे. यापूर्वी मोठ्या संख्येने मिळणारे मासे, आता कासाडी नदीमध्ये मिळत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
विशेष म्हणजे, याबाबत अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड आणि पनवेल मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रारी देऊनही कोणत्याच कंपन्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नवी मुंबईत फिरतायत निळ्या रंगाचे कुत्रे
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई
Updated at:
14 Aug 2017 11:40 AM (IST)
नवी मुंबईतील तळोजा परिसरात सध्या निळ्या रंगांची काही कुत्रे फिरत आहेत. निळ्या रंगाचा कुत्रा पाहून अनेकांना कुत्र्याची ही नवी प्रजात आली कुठून असा प्रश्न पडत आहे. पण इथल्या कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्याचा कुत्र्यांवर परिणाम झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -