मुंबई : दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल तर फक्त तुमच्यावरच नाही तर गाडीत तुमच्यासोबत असलेल्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक ऍक्ट नुसार कारवाई केली जाईल.


ट्रॅफिक विभागाकडून 94 टीम
यंदा 31 डिसेंबरच्या रात्री ड्रिंक अँड ड्राइव्ह मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी ट्रॅफिक विभागाकडून 94 टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. जर पोलिसांना एखाद्यावर मद्यपान करून गाडी चालवण्याचा संशय आला तर त्याची ब्लड टेस्ट केली जाईल आणि जर त्यामध्ये मद्यपान केल्याचं आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी 677 प्रकरणं नोंदवण्यात आली होती. त्यानंतर ट्रॅफिक विभागाने महाराष्ट्र परिवहन विभागाला या सर्वांचे लायसन्स सहा महिन्यासाठी रद्द करण्यासाठी पत्र लिहुन शिफारस केली होती.


3000 ट्रॅफिक कर्मचारी यंदा 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या रस्त्यांवर असतील आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सज्ज असतील, अशी माहिती मिळाली आहे.