कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने शून्य कचरा मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. शहरातील टाकाऊ प्लास्टिक पासून इंधन निर्मिती करणारा प्रकल्प बारावे येथील आरक्षित भूखंडावर उभारण्यात आला असून या प्रकल्पातून इंधन निर्मितीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.


रुद्र इन्व्हायरमेंन्ट सोलुशन लिमीटेड आणि महानगरपालिका यांच्या वतीने सीएसआर फंडातून सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पातून 85 लिटर इंधन तेलाची निर्मिती करण्यात आली. सदर इंधन तेल बॉयलरसाठी वापरता येणार असून, वाहनांमध्ये त्याचा वापर इंधन म्हणून होऊ शकते का, याची चाचणी सुरु आहे. या प्रकल्पातून इंधन निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे महानगरपालिकेने परवानगी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे.


हा प्रकल्प रुद्र इन्व्हायरमेंन्ट सोल्युशन लिमीटेड आणि महानगरपालिका एकत्रीतरित्या राबवित असून यासाठी लागणारी जागा महानगरपालिकेने पुरविलेली आहे. या प्रकल्पाची क्षमता 1 टन प्लास्टिकची असून त्यातून सुमारे 500 लिटर इंधन तेल तयार होऊ शकते अशी माहिती पालिकेने दिली.