मुंबई : मुंबईमध्ये अंध आणि अंपगांचा प्रवास मोफत होणार आहे. येत्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये, अंध आणि अपंगांना बेस्टच्या मोफत प्रवासासाठी एक कोटी रुपयांची विशेष तरतूद केली जाणार आहे.
विनावातानुकूलित बस सेवेतून प्रवास करणाऱ्या अंध आणि 40 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना मोफत प्रवास करता येईल. मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
महिलांसाठी विशेष बस
राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत लेडीज स्पेशल बस सेवा सुरु करण्यासाठी 50 नवीन बसेसची मागणी बेस्टनं केली आहे. या योजनेतंर्गत 50 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. राज्य सरकारनं बेस्टच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास लवकरच मुंबईत महिला प्रवाशांसाठी विशेष बस धावताना दिसतील.
बेस्ट अॅप
बेस्टच्या बस स्टॉपवर मुंबईकरांना ताटकळत राहण्याची गरज नाही. कारण बसच्या आगमनाची अचूक माहिती देणाऱ्या मोबाईल अॅप्लिकेशनचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु करण्यात आला आहे.
रेल्वेची माहिती देणाऱ्या एम-इंडिकेटरच्या धर्तीवर हे मोबाईल अॅप तयार करण्यात आलं आहे. झोपहॉप नावाच्या कंपनीनं बेस्टसाठी हे तंत्रज्ञान तयार केलं असून 12 बसमध्ये याचा प्रायोगिक तत्त्वार वापर करण्यात येत आहे.