शिवसैनिकांनी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्याला फासलं काळं
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2016 01:15 PM (IST)
कल्याण: कल्याणमध्ये आज शिवसैनिकांनी महापालिका परिवहन मंडळाचे सदस्य आणि जिल्हा भाजप कार्यकारिणी सदस्य सुभाष म्हस्के यांच्या तोंडाला काळं फासलं आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील लोकग्राममध्ये घडली. उल्हासनगरमधील शिवसेना महिला पदाधिकारी सेक्स रॅकेट चालवित असल्याचे उघड झाल्यावर, काही मंडळीनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया व्यक्त करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील एका व्हाटसअॅप ग्रुपवर शिवसेनेच्या विरोधात प्रतिक्रीया व्यक्त केल्या. या ग्रुपचे अॅडमिन म्हस्के होते. त्यामुळे म्हस्के यांनी ग्रुप अडमिन म्हणून हा प्रकार थांबविण्याची गरज असल्याचे शिवसैनिकांना वाटत होते. पण त्यांनी तसे काही न केल्याने संतप्त शिवसैनिकांनी म्हस्के यांच्या तोंडाला काळं फासलं. या प्रकरणी कल्याण पूर्वे पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.