भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक, संघटन मंत्र्यांना शिव्यांची लाखोली
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 06:19 PM (IST)
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भाजपमध्ये निष्ठेपेक्ष पैसा मोठा झाला आहे. निष्ठेने काम करणाऱ्यांची पक्षात गरज नाही, असं म्हणत एका भाजप कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला. तसंच शिव्यांची लाखोली वाहिली. भाजपने विधानपरिषदेसाठी निष्ठावंतांना डावलून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या बाहेरुन आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरुद्ध आता भाजपमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे. एकीकडे तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगत आहे. मात्र मुंबईत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. दादर भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली. या गुप्त बैठकीचा व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चक्क शिव्यांची लाखोली वाहिली आहे. पाहा व्हिडीओ