पुलगाव स्फोट : अपघात की घातपात?
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 07:03 AM (IST)
मुंबई: देशातील सर्वात मोठं शस्त्रास्त्र भंडार असलेल्या वर्ध्यातील पुलगावमध्ये सोमवारी रात्री भीषण अग्नितांडव झालं. आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं आणि भारतातील सर्वात मोठं शस्त्रभांडार असलेल्या पुलगावमध्ये आगीनंतर स्फोटांची मालिका झाली. या स्फोटात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यासह 20 जवान शहीद झाले आहेत. पुलगाव दारुगोळा भांडारात नेमकी आग कशामुळे लागली, याबाबतची माहिती चौकशीनंतर समोर येईल, मात्र पठाणकोटप्रमाणे इथेही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निवृत कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली. आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे. इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो. मात्र आज जी आग लागली ती नेमकी कोणत्या बंकरला लागली आणि त्या बंकरच्या सुरक्षेसाठी किती जवान होते, हे अद्याप समजू शकलेलं नाही. संबंधित बातम्या