मुंबई : राज्यसभा निवडणुकीतही तिन्ही जागा निवडून आणून महाविकास आघाडीला घाम फोडलेल्या भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की कळालाच नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासूम ज्याची प्रतीक्षा होती, त्याचा निकाल 3 वाजता आल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 
 
चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की, ते आमचा गुडग्यात आहे म्हणत होते, पण आता ते गुडघ्यावर बसले आहेत, कसा विजय मिळवला हे त्यांना अजूनही कळालेलं नाही. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. देवेंद्रजी प्रेमळ आहेत, त्यांनी एक विश्वास तयार केल्याचे ते म्हणाले. 


राज्यसभेप्रमाणेच आम्हाला विधान परिषदेसाठीही मतदान होईल. अनेकजण गुप्तपणे फडणवीस यांना हात धरून सांगत होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीमध्येही आम्ही जागा जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला विधान परिषदेसाठी प्रस्ताव दिला. अर्ज माघारीसाठी दोन दिवस उरले आहेत, शहाणे आणि समजूतदार असाल तर आताच अर्ज मागे घ्या आणि निवडणूक बिनविरोध करा, अन्यथा आम्ही लढणारच आहोत आणि जिंकणारही आहोत, असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी दिला. 


देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही हल्लाबोल


राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळालं असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यानी आता अंतमुर्ख होऊन विचार करायला हवा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवायचा असल्याचे ते म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली. निवडणुकीत जे विजयी होतात त्यांनी आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.