Pre-Monsoon Rains in Mumbai : गेले काही महिने प्रचंड उकाड्याने मुंबईकर नागरिकांचे अतोनात हाल झाले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत झालेल्या या मान्सून पूर्व सरींमुळे नागरिक सुखावले आहेत. मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही मुंबईकरांनी पावसाचा आनंद व्यक्त केला आहे.


येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडणार - SKYMET
स्कायमेटच्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. त्यामुळे मान्सूनसाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे, दरम्यान, गुरूवारी झालेल्या पावसाची सध्या चांगली नोंद झाली असून, सांताक्रूझ येथे 41 मिमी पाऊस पडला. येत्या काही दिवसांत शहरातील अनेक भागात चांगला पाऊस पडणार आहे. असा अंदाज स्कायमेटकडून वर्तविण्यात आला आहे. 


 






येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचेल
दरम्यान, येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मॉन्सून पोहोचेल, असे भारतीय हवामान खात्याने गुरुवारी सांगितले. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले की, मान्सूनने 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन होईल.


 






 


पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल


पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून रात्रीपासून ढगांच्या गडगडाटाह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं वातावरणात असलेला उकाडा कमी झाला असून, गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून बळीराजाही सुखावला आहे.


मान्सून अखेर कोकणात दाखल 


सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ


दरम्यान, पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्ताल्यासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळं आयुक्तालयात 20 हून अधिक वाहन अडकली होती. झाड हटवायला बराच वेळ लागला, त्यानंतर वाहनं आयुक्तालयातून बाहेर पडली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं विविध ठिकाणी सुमारे 30 झाडपडीच्या घटनांची अग्निशमाक दलाकडे नोंद झाली आहे. तसेच नाशिक शहरात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडटासह मुसळधार पाऊस झाला