मुंबई : भाजपा ही मुंबईत नंबर वन पार्टी आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे, असं माजी मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. सध्या पक्षाकडून विधानसभा निहाय आढावा घेण्यात येत आहे. तसेच मुंबईतील बैठकीत संघटनात्मक नवीन नियुक्ती तसेच मुंबई 227 वॉर्ड निहाय चर्चा होत असल्याची माहितीही आशिष शेलार यांनी दिली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला तगडं आव्हान देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.


मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड अध्यक्ष, मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, सहा लोकसभा मतदारसंघ प्रमुख, जिल्हाध्यक्ष यांच्या नियुक्त्या आणि फेरनियुक्त्या याबाबतच्या चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. मुंबईत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून क्रमांक एकचा पक्ष भाजपच असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं. भाजपच्या संघटनात्माक बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, व्ही. सतीश यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.


सध्या मुंबई महापालिकेतील पक्षांचे संख्याबळावर नजर टाकल्यास शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे अपक्षांसह सर्वाधिक 94 नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजप दुसरा मोठा पक्ष असून भाजपचे एकूण 83 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.