मुंबई : गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिकेत दीड लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आम्ही यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. महापालिकेत यशवंत जाधव, इकबाल सिंह चहल यांच्या रूपात सचिन वाझे बसले आहेत, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला.


''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा, तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही हे मुख्यमंत्र्यांनी काल 25 वर्षानंतर तरी स्वीकारले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने टीका करणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं. पण काल त्यांनी टीका केल्यामुळे आम्हाला भूमिका बदलावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं श्रेय उद्धव ठाकरे घेत आहेत, अशी टीका अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 
 
प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर पाच सदस्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. 


प्रभाकर शिंदे यांनी महापौरांकडे पाठवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे, "आयकर खात्याच्या अहवालानुसार मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन सफेद करण्यासाठी पैशांची अवैध अफरातफर केल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीच्या सभेत महत्वाच्या विषयावर, आर्थिक, भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहार, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचारावर, पोयसर नदी मलजल प्रक्रीया केंद्राच्या प्रस्तावातील भ्रष्टाचारावर संसदेत बोलू न देणे, घाईघाईत प्रस्ताव मंजूर करणे तेसच प्रस्तावास तीन दिवस झाले नसताना प्रस्ताव विचारात घेणे या सर्व कायदेविसंगत अनियमितता व लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या वर्तवणुकीबद्दल अविश्वास व्यक्त करत आहोत."


 जाधव यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर प्रशार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. शिंदे म्हणाले, 2006 साली जे टॅब 6 हजारांना दिले तेच टॅब 2010 साली 10 हजारांना दिले. तर आता हे टॅब 20 हजारांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच 2250 कोटींच्या रस्त्यांचे प्रस्ताव कुणालाही विश्वासात न घेता पास केले. आजही रस्त्यांच्या दर्जांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र त्यावर कुठलेही उत्तर दिले जात नाही. प्रस्तावांची माहिती ठराविक वेळेत देणं अपेक्षित असताना वर्ष-वर्ष त्यावर उत्तर देत नाहीत. पोयसर नदीचा प्रस्ताव 500 कोटींचा होता. ती किंमत दुप्पट करत आता 1100 कोटी झाली आहे. कंत्राटदाराला कोणताही अनुभव नसताना या पूर्वीच्या कामाचा आढावा न घेता त्याला कंत्राट दिलं गेलं. यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला परंतु, वेळ दिली नाही." 


"भाजपकडून काल पालिकेत वाजे गिरी करणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या वाजे गिरीवर अविश्वासाचा ठराव आणला आहे. नियम, कायदे, परंपरा हे पायदळी तुडवून भ्रष्टाचार करण्यासाठी पालिकेत सत्ता येणार नाही. पराभव होईल या भीतीने सध्या सत्ताधरी काम करत आहेत, असा ओरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.