मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांना आज प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्याहून येणाऱ्या अवजड वाहनांचा मार्ग बदलण्यात येईल, किंवा आजच्या दिवसासाठी प्रवेश बंद असेल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बीकेसीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी एससीएलआर मार्गावरुन प्रवास टाळण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
पूर्व उपनगरातील मुंबईकरांनी जेव्हीएलआर, एलबीएस रोड, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे या मार्गांचा, तर पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी एसव्ही रोड, लिंकिंग रोड या मार्गांचा वापर करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.
भाजपच्या बाईक रॅलीचा शिवसेना नगरसेविकेसह मुंबईकरांना फटका
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या स्वागत मिरवणुकीसाठी मुंबई भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळापासून बीकेसीपर्यंत हजारो बाईक्सची रॅली काढण्यात आली. यामुळे भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन झालं, मात्र याचा फटका मुंबईकरांना बसला.
या बाईक रॅलीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. मुंबईकर सुमारे चार तास वाहतूक खोळंब्यात अडकले होते. तर शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांच्या 6.45 वाजताचं दिल्लीचं फ्लाईट मिस झालं.
राजुल पटेल यांच्या मुलीचं दिल्लीत लग्न आहे आणि संध्याकाळी त्यांना हळदीच्या कार्यक्रमाला पोहोचायचं होतं. मात्र वाहतूक खोळंब्यामुळे त्यांचं फ्लाईट सुटलं आणि त्यांना 9 वाजता सूर्य फ्लाईटने दिल्लीला जावं लागलं. राजुल पटेल अशा एकट्या नसून अनेकांना या वाहतूक खोळंब्याचा फटका बसला.