युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2017 02:10 PM (IST)
मुंबई : युती तुटण्याची घोषणा होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये टीकांचे बाण सुरु होतेच, मात्र युती तुटल्याच्या अधिकृत घोषणेनंतर या टीकेला अधिक धार चढली आहे. शिवसेनेच्या 'डीड यू नो' पोस्टर्स भाजपने पोस्टरबाजी करुन उत्तर दिलं आहे. भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या 'प्रगतीच्या वाटचाली'वर पोस्टरच्या माध्यमातून ताशेरे ओढले आहेत. रस्ते, ट्राफिक, झोपडपट्टी, प्रदूषण, पाणी, कचरा, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत. ह्याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपने पोस्टरवर विचारला आहे. #BJP4BMC असा हॅशटॅग पोस्टरवर जोडला आहे. आता भाजपला बहुमत द्या, असं आवाहन केलं आहे.