मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात एक निवेदनही दिलं. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती.
उदयजनराजेंनी मराठा आरक्षणाला होत असलेल्या दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताली वेळकाढूपणा, हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सूचना राज्य सरकारला देऊन हा विषय मार्गी लावावा, असं आवाहनही उदयनराजेंनी केलं. मराठा आरक्षणसंबंधी काही मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्यास राज्य सरकारला भाग पाडावे, जेणेकरुन समाजान निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असं आवाहन उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं.
Maratha Reservation | दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या : उदयनराजे
कोणत्या मुद्यांवर श्वेतपत्रिका काढावी?
- एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार का?
- जर मोठ्या प्रमाणावर ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा केसवर परिणाम होणार का?
- जर ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवलं तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?
- महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल.
- एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करुन त्यांना नोकरीत का सामावून घेत नाहीत?
उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवार यांची भेट
काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच शरद पवारांची भेट घेतली असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टात सरकारच्या वकिलांनी मराठा आरक्षणाच्या योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावर वडिलकीच्या नात्याने लक्ष घालावं, असं उदयनराजेंनी म्हटलं होतं.