मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात आलं नाही असंही ते म्हणाले.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे. कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला आणि 22 जून रोजी बंडखोर आमदार गटात सामील होण्याची विनंती केली. भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवण्यास योग्य नसल्यामुळे त्यांना गटात घेण्यास एकनाथ शिंदेजी नाखूष होते. भास्कर जाधव यांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केले. भास्कर जाधव हे सत्य नाकारू शकतात का?"
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून भास्कर जाधवांनी भाजपवर टीका करायची एकही संधी सोडली नव्हती. राज्यात सत्तांतर झालं आणि भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर तुफान हल्ला चढवला. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे गटातील नेते, नारायण राणे तसेच भाजपचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते भास्कर जाधव हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत.
मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री शिंदेंचा दिलासा
भाजप नेते मोहित कंबोज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा देत सांताक्रुझमधील चार फ्लॅटमधील त्यांचे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंजूर आराखड्यानुसार, बांधकाम नसल्यानं तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं कंबोज यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर कंबोज यांनी नगरविकास खात्याकडे अपील केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय देत कंबोज यांना दिलासा दिला आहे. खास बाब म्हणून निर्णय दिला असून इतर प्रकरणांमध्ये हे प्रकरण उदाहरण म्हणून मानलं जाऊ नये, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
मोहित कंबोज यांच्या घरासोबतच त्यांच्या कार्यालयात झालेल्या अनधिकृत बांधकामांशी संबधित नोटीसही त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना दिली होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोहित कंबोज यांना फटका बसू शकतो, असं बोललं जात होतं. तसेच, एमआरडीपी या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार असंही बोललं जात होतं. त्यांनी आपल्या घरात आणि कार्यालयाच्या बांधकामात काही बदल केल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.