मुंबई : राज्यात भाजप आणि मनसेची युती होईल का नाही ते आताच सांगू शकत नाही, मात्र मुंबईतील समस्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं सूचक वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केलंय. राजकारणात काहीही होऊ शकतं, भाजप आणि मनसे जर एकत्रित आले तर त्यात माझा वाटा असू शकतो असंही वक्तव्य बाळा नांदगावकरांनी केलंय. भाजपच्या 'धन्यवाद देवेंद्रजी' या कार्यक्रमानंतर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. याच कार्यक्रमाच्या स्टेजवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांनी बाळा नांदगावकरांचा उल्लेख आमचे सहकारी असा केल्याने मनसे आणि भाजप एकत्रित येणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. 


म्हाडा, एसआरएतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या सोडवल्याबद्दल  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी भाजपकडून 'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे उपस्थित होते. 


निवडणुकीच्या तोंडावर भाजप-मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच मनसे नेते भाजपच्या व्यासपीठावर  मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई दिसल्याने सर्वाच्या भूवया उंचावल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाषणादरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा ‘आमचे सहकारी’ म्हणून उल्लेख करण्यात आला. 


फडणवीसांनी निरोप दिला म्हणून कार्यक्रमाला आलो


बाळा नांदगावकर म्हणाले की, मला प्रवीण दरेकरांचा फोन आला होता. फडणवीस यांनी कार्यक्रमासाठी निरोप दिला होता, बाळा भाऊंना बोलवा म्हणून. त्यानंतर या कार्यक्रमाला जा असं राज साहेबांना सांगितलं . म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आलो. मुंबईच्या समस्यांवरील ही परिषद होती त्यामुळे त्यासाठी एकत्र येणं गरजेचं होतं.


राजकारणात काहीही होऊ शकतं


युती करायची नाही करायची हा पक्षप्रमुखांचा विषय आहे, हा माझा विषय नाही असं सांगत बाळा नांदगावकर म्हणाले की, भविष्यात काय होईल काही सांगता येणार नाही. राजकारणात काही अशक्य किंवा शक्य नाही.भाजप आणि मनसेची युती झाली तर अडचण होण्याचं कारण नाही. युती होऊ शकते किंवा नाही पण. आम्ही एकत्र येणार किंवा नाही येणार, निवडणुकीत चर्चा होतच असतात. मुंबईतील समस्यांसाठी तरी आता आम्ही एकत्र आलो आहोत. भविष्यात काय होणार ते नेते ठरवतील, राजसाहेब राज्यातले नेते फडणवीस ठरवतील. मात्र त्यात माझा देखील काही वाटा असू शकतो. युतीसाठी काही अडचण असण्याचं कारण नाही, आम्ही वारंवार भेटत असतो, बोलत असतो. 


ही बातमी वाचा:



Bala Nandgaonkar on BJP - MNS Alliance : मुंबईच्या समस्यांसाठी एकत्र, मनसे - भाजपची युती?