मुंबई : संजय राऊतांना बेळगावमध्ये निवडून आलेले संतोष पेडणेकर, जयंत जाधव, सविता कांबळे, रवी धोत्रे, रेश्मा पाटील असे अनेकजण मराठी माणसे वाटत नाहीत का? कारण काय तर ते म्हणे ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले नाहीत म्हणून ते मराठीच राहिले नाहीत? मराठी माणसाचा राऊत यांना एवढा आकस का? असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांचा पराभव झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं आहे.


गोपीचंद पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी युती तोडण्यावरून शिवसेनेला चिमटे काढले आहेत. महाराष्ट्राच्या मतदाराने युतीला बहुमत दिले. पण नंतर तुम्ही मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला.  पाकिस्तान आणि कलम 370चे  गोडवे गाणाऱ्यांसोबत सत्तेचा मेवा तुम्ही खाताय. हे बेळगावलाच नाहीतर अखंड भारताला समजले आहे. दिल्लीतल्या मॅडमला आणि युवराजांना सत्तेसाठी खुष करण्यासाठी तुम्ही वारकऱ्यांना गुन्हेगार ठरवून मराठीजणांचा सन्मान असलेल्या वारीवर दंडुकशाहीचा वापर केला. असं म्हणत पडळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


Sanjay Raut : मराठी माणूस हरल्याबद्दल जे पेढे वाटतायत अशा गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही:


गोपीचंद पडळकर म्हणाले की, वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवला. त्यांचाच शाप व तळतळाट तुम्हाला आता इथूनपुढेही भोगावा लागणार आहे. किंबहूना आपला पराभव म्हणजे बेळगावच्या मराठी माणसाने तुमच्या 15 कोटीच्या ‘पेंग्विन ‘ विकासाचा मॉडल नाकारले आहे. असं सांगायलाही ते विसरले नाहीत.


गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, हिंदू सण आले की तुम्ही निर्बंध लादता व इतरांच्या सणासुदीला सत्तेसाठी मुजरे करता अशा तुमच्या पाखंडी वृत्तीचा बुरखा फाटलाय आणि तुमचा खरा चेहरा प्रत्येक हिंदूच्या पुढे उजळून आलाय, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.


Belgaum Municipal Corporation Results: बेळगाव महापालिकेवर कमळ फुललं, भाजपची एकहाती सत्ता, महाराष्ट्र एकीकरण समितीचा सपाटून पराभव


काय म्हणाले होते राऊत 
बेळगाव महापालिकेच्या (Belgaum election results) निवडणूक निकालात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले होते की, मराठी माणसाचा पराभव घडवून आणला गेला आहे. हा अनपेक्षित निकाल आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जात आहे. ही नादानी आहे. अशी इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. लाज नाही वाटत का? असं  संजय राऊत म्हणाले होते.


भाजपनं जिंकल्या 35 जागा


भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं 35 काँग्रेसनं 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समिती 4 आणि एमआयएम एक असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली. महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 32 सदस्य आधीच्या सभागृहात होते. तर कन्नड उर्दू गटाचे 36 सदस्य होते.