मुंबई: तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असं म्हणत भाजपचे आमदार राम कदम यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. घाटकोपरमध्ये काल दहीहंडी उत्सवात राम कदम बोलत होते.


"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या.  जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.

राम कदम यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकारानंतर राम कदम यांनी हा व्हिडीओ अर्धवट दाखवल्याचा आरोप केला. या व्हिडीओच्या मागचा आणि पुढचा भाग ऐकला तर संदर्भ लागेल, अर्धवट दाखवून जनतेची दिशाभूल करु नका, असं राम कदम म्हणाले.

यानंतर एबीपी माझाने राम कदम यांना संपूर्ण व्हिडीओ दाखवला. त्यानंतर राम कदम यांनी आपला म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावेळचं वातावरण हलकं फुलकं होतं. काही राजकीय पक्ष या व्हिडीओचं राजकारण करत आहेत, असं राम कदम म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

राम कदम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपण काय करतोय, कुणासमोर बोलताय, उत्साहाच्या भरात काय बोलतोय याचं भान सत्ताधाऱ्यांना राहिलं नाही. आज महिलांची स्थिती बिकट आहे, त्या असुरक्षित आहेत. त्यात अशी वक्तव्य करुन राम कदमांना नक्की काय म्हणायचं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

जबाबदारीने बोललो, तर स्पष्टीकरण देण्याची गरज भासत नाही. राम कदम सवंग प्रसिद्धीसाठी काय करु शकतात, हे राज्यातील जनतेने पाहिलं आहे, असं चित्रा वाघ यांनी नमूद केलं.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

एका मुलीचा बाप म्हणून मला भिती वाटायला लागली. जर राम कदमांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला, तर माझ्या मुलीला उचलून घेऊन जायचे. बाप म्हणून मला काळजी वाटायला लागली. अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. पोरगी किंवा पोरगा हा मतभेद नाही, ही गुन्हेगारी आहे. तुम्हाला आवडली की मी घेऊन येतो, असं होत नाही. उलट त्यांनी असं सांगायला हवं होतं की जर तुमचं प्रेम असेल, तर दोघांच्या घरच्यांशी बोला, त्यातून मार्ग काढा. एक बाप म्हणून मी बोलतोय, कारण असं माझ्या पोरीच्या बाबतीत घडलं तर?  कुणाच्याही पोरीच्या बाबतीत घडू शकतं. अशा वक्तव्यांमुळे लोकांची हिम्मत वाढते. राम कदमांसारखा मोठा, पैसेवाला आमदार, मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार असं बोलत असेल तर नक्कीच भितीदायक आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अशा घटनांच्या तक्रारी तर कुठे करायच्या? महाराष्ट्रात तक्रार करायची सोय राहिली नाही. लोकांनीच आमचा प्रतिनिधी कसा आहे, हा विचार करावा, असंही आव्हाड म्हणाले.

पूर्वी म्हणायचे  'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर' ही परिस्थिती नाही. आज लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे. आमदार म्हणजे काही राजा नाही. इथे प्रत्येकाला समान न्याय आहे, असं आव्हाड यांनी नमूद केलं.


संबंधित बातम्या 

पूर्वी म्हणायचे 'टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर', आव्हाडांचा राम कदमांवर हल्लाबोल