भाजप आमदाराने पत्नीला गिफ्ट केलेल्या लॅम्बोर्गिनीला अपघात
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2016 02:36 PM (IST)
मुंबई : मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपल्या पत्नीला 5 कोटींची लॅम्बोर्गिनी कार भेट दिली. मात्र पत्नीने ही महागडी कार रिक्षाला धडकवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 27 ऑगस्ट रोजी मेहतांनी आपली पत्नी सुमन मेहता यांना वाढदिवसानिमित्त लॅम्बोर्गिनी कार भेट दिली होती. याच कारने 28 ऑगस्टला सेव्हन इलेवन शाळेसमोर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षाला पत्नीने धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी कारमध्ये नरेंद्र मेहताही होते, मात्र कार सुमन मेहता चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. अद्याप ऑटो रिक्षावाल्यानं पोलिसात तक्रार दिलेली नाही. आमदार नरेंद्र मेहता सेवन इलेवन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत.