मारहाणीत जबर जखमी झालेल्या पोलिसाच्या भेटीला राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2016 09:58 AM (IST)
मुंबई: बाईकस्वारांच्या मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पोलीस विलास शिंदे यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिंदे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं. या राज्यात पोलीसच सुरक्षित नसतील तर जनतेचे काय असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला. काय आहे प्रकरण? गेल्या मंगळवारी कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन विना हेल्मेट गाडी चालवताना पकडलं. त्याच्याकडे लाईसन्सदेखील नव्हतं. याबाबत चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलानं आपल्या भावाला बोलावून घेतलं. त्याच्या मोठ्या भावाने मागून येऊन थेट पोलिसाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल केलं. मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केलं आहे.