मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेआधी शिवसेना नेत्यांच्या व्हायरल क्लिपबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केला. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. न्यायालयीन प्रक्रियेआधी अनिल परब यांना जामीनाबाबत माहिती कशी मिळाली? अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत आहेत का? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
काल शिवसेनेच्या मंत्र्याच्या व्हायरल क्लिपमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा देखील हा प्रयत्न आहे. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असं देखील अनिल परब यांनी म्हटलं. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्याचं जाहीर कार्यक्रमात स्वत:चं अज्ञान उघड पडलं. स्वत:चं अज्ञान उघड पडलं म्हणून हा सगळा प्रकार आहे. अज्ञान लपवण्यासाठी त्यांचा हा थयथयाट सुरु आहे. राणे साहेब याआधीही अनेकदा बोलले आहेत त्यांची बोलण्याची एक शैली आहे. परंतु सेनेने राडा केला. झालेल्या घटनेमुळे आपण देशाची माफी मागणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
राज्याचे मुख्यमंत्री देशाचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव कसा विसरू शकतात. त्यांनी हा संभ्रम जाणीवपूर्वक केला का? म्हणून त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही येत्या काळात भाजप युवा मोर्चाच्या वतीने 75 हजार पोस्टकार्ड पाठवून भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली याची आठवण करून मुख्यमंत्री यांना देणार आहोत. जर त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर आम्ही गांधीगिरी करत मुख्यमंत्र्यांना गुलाबाची फुलं पाठवणार नाही तर गुलाबाचे काटे पाठवून ही आठवण करून देणार आहोत. असं ही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
Narayan Rane : आंदोलन...अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात?
काल नेमकं काय काय घडलं
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन ते त्यांना अटक आणि रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या फिल्मी स्टाईलने राजकीय घडामोडी घडल्या. रायगड कोर्टाकडून नारायण राणेंना जरी जामीन मिळाला असला तरी हा राजकीय धुरळा आजही खाली बसण्याची शक्यता कमी आहे.
Narayan Rane : 'मगर आसमान में थुंकने वालो...करारा जवाब मिलेगा'; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
काय म्हणाले नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या दरम्यान महाड येथे सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. "स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती" असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन मोठा वाद झाला.